तवा आश्रमशाळेतील अमानुष मारहाण प्रकरणी;आदिवासी प्रकल्प कार्यालयात ‘शाळा’ भरवून लाल बावट्याचा अनोखाआंदोलन इशारा

तवा आश्रमशाळेतील अमानुष मारहाण प्रकरणी;आदिवासी प्रकल्प कार्यालयात ‘शाळा’ भरवून लाल बावट्याचा अनोखाआंदोलन इशारा
डहाणू /प्रसाद भालेराव
तालुक्यातील तवा आश्रमशाळेत विडी पिण्याच्या केवळ संशयावरून आदिवासी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करून दोन दिवस उपाशी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गंभीर प्रकरणात संबंधित शिक्षकांवर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, अशी ठोस मागणी करत लाल बावटा पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी या प्रकरणात उडवा-उडवीची उत्तरे देत मागण्या धुडकावल्याचा आरोप पक्षाने केला आहे. याच्या निषेधार्थ मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू कार्यालयात प्रत्यक्ष ‘शाळा’ भरवून अनोखे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
लाल बावटा पक्षाच्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत;
•संबंधित शिक्षकांवर तात्काळ गुन्हा दाखल करणे
तत्काळ निलंबन
•पीडित विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणी व मदत
•स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती नेमणे.
•निरीक्षक मंडळ स्थापन करणे.
•४८ तासांत सविस्तर अहवाल सादर करणे.
“आदिवासी विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार सहन केले जाणार नाहीत. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर शैक्षणिक वातावरण बिघडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा इशारा पक्षाने दिला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सहसचिव कॉम्रेड. शेरू वाघ, डहाणू सहसचिव कॉम्रेड. किरण दुबळा, पालघर सहसचिव कॉम्रेड. सुशांत मेरे व सदस्य कॉम्रेड शिवा कांबळे करणार आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांतूनही होत आहे.