साध्या भोळ्या, कष्टाळू आणि उच्चशिक्षित लोकांची ओळख सांगणारे लहान वाघोदे हे गाव.

साध्या भोळ्या, कष्टाळू आणि उच्चशिक्षित लोकांची ओळख सांगणारे लहान वाघोदे हे गाव.
प्रतिनिधी / विशाल दांडगे
सावदा : २४ फेब्रुवारी २०२६
जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागातील रावेर तालुक्यातील सावदा रेल्वे स्टेशन आणि सावदा या दरम्यान रस्त्याच्या कडेवर वसलेलं लहान वाघोदे (वाघोदे खुर्द) हे गाव .
गावाचा मुख्य पारंपारिक व्यवसाय हा शेती आणि शेतमजुरी. मुठभर मध्यमवर्गीयांची आणि दोन-तीन श्रीमंतांची घरे सोडली तर गावातील ९९.००% समाज हा शेती आणि केळी व्यवसाय, मजुरी वरच जगणारा….. गावातील पिढ्यान पिढ्या एकतेने आणि आनंदाने नांदणाऱ्या …. गावात प्रामुख्याने थोरगव्हाणकर (लेवा पाटील) समाजाची वस्ती. सोबतच कोळी ,बौद्ध , मुस्लिम आणि गावगाड्यात राहणाऱ्या लहान जात समूहांची वस्ती. गावाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक इतिहास बघितला असता शैक्षणिक आणि सुधारणावादी विचार स्वीकारण्यात आपले गाव नेहमीच पुढे राहिले आहे. जात, धर्म, पंथ असतानाही गावाने मात्र सतत माणुसकीचा आणि मानवतेचा धर्म स्वीकारलेला असल्याचे ऐतिहासिक पुरावे आणि सामाजिक संदर्भ मिळतात. गाव गाड्यात लहान सहान भांडण, मतभेद सोडली तर माझ्या गावाने नेहमीच एकात्मतेची आणि समतेची शिकवण इतरांना दिलेली दिसते. अर्थातच गावातील सगळ्या समाजाला आणि माणसांना शहाणपण देण्याचं कार्य माझ्या गावातील स्वातंत्र्यपूर्व कालखंडात स्थापन झालेल्या शाळेने केले आहे…..
ब्रिटिशांच्या काळात १८९१ साली आपल्या गावात प्राथमिक शिक्षण देणारी शाळा आली आहे. जेव्हा आपल्या देशावर ब्रिटिशांचे राज्य होते त्या काळात शेतकऱ्यांची, शेतमजुरांची मध्यमवस्ती असलेल्या या गावात शिक्षण देणारी शाळा येणे हा नक्कीच एक क्रांतिकारक बदल होता. यावरून आपल्या गावातील त्या काळातील पिढी किती पुढारलेल्या आणि दूरदृष्टीच्या विचारांची होती याची साक्ष आपल्याला पटल्याशिवाय राहत नाही. आज आपल्या गावातील ज्या शाळेने आपल्या गावातील कित्येक पिढ्या घडवल्या त्या शाळेला १३५ वर्ष पूर्ण झालेली आहेत ….. आपल्या गावाच्या विकासात महत्त्वाचं योगदान देणारी ही आपली प्राथमिक शाळा…. जर का ही प्राथमिक शाळा १३५ वर्षांपूर्वी आपल्या गावातील त्या काळातील नेतृत्व करणाऱ्या आदरणीय लोकांनी काढली नसती तर कदाचित गावगाड्यातील गरीब, कष्टकरी आणि लहान लहान समाजातील अनेक पिढ्या शिक्षणाच्या प्रक्रियेत येऊन त्यांचा विकास झालाच नसता. नोकरीच्या निमित्ताने मोठमोठ्या अधिकारी पदांवर गावची माणसे गेलीत ती केवळ आपल्या गावच्या या प्राथमिक शाळेमुळेच….! गावातील जुन्या पिढीतील अनेक प्रतिभावंत मातब्बर शिक्षक या शाळेने दिले…… स्वर्गीय नामदेव मार्तंड चौधरी , रामचंद्र चौधरी , वसंत चौधरी , पंढरीनाथ चौधरी , नामदेव कोळी , एकनाथ कुरकुरे , अकबर पटेल ,श्री.श्रीधर मेढे ,श्री.गंगाधर मेढे गुरुजी अशी खूप नावे सांगता येतील ….. त्यामुळेच ही शाळा टिकली पाहिजे…. ती सुंदर नव्या रूपात आधुनिक झाली पाहिजे पुढील गावातील पिढ्यांना आधुनिक करण्यासाठी…!
आपल्या गावातील या शाळेने स्वातंत्र्याच्या आधी शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती केली आहे. प्रत्येक घरातील आपल्या आजोबांच्या पिढीतील माणसांना शिक्षण देण्याचे काम या शाळेने केले आहे. ज्या काळात समाजात आणि गावागावात डॉक्टर सापडत नव्हते त्या काळात आपल्या गावातून दोन डॉक्टर या शाळेच्या माध्यमातून घडले आहेत. स्वर्गीय डॉक्टर अनंतराव चौधरी आणि स्वर्गीय डॉक्टर गंगाराम चौधरी . कधी काळी डॉक्टरांचे गाव म्हणून आपले लहान वाघोदा गाव हे ओळखले जात होते. त्याचे अनेक संदर्भ आजही मिळतात. स्वातंत्र्याच्या आधी जर्मन देशात मध्ये जाऊन या दोघेही बंधूंनी वैद्यकीय शिक्षणात आपले नाव कमावून ते मायदेशी परतले होते …. त्या काळात या डॉक्टर बंधूंनी ठरवले असते तर मुंबईसारख्या शहरात राहून वैद्यकीय सेवा देऊन ते करोडपती झाले असते. परंतु आपलं शिक्षण ज्या मातीतून आपण घेतले आहे त्या मातीतील माणसांच्या कामासाठी आपले शिक्षण आले पाहिजे या विचारांनी या दोघेही डॉक्टर बंधूंनी आपली वैद्यकीय सेवा लहान वाघोदे आणि परिसरात दिलेली आपल्याला दिसते. आजही ९० च्या आसपास गेलेली तापी काठावरील वृद्ध माणसे जेव्हा भेटतात तेव्हा माझ्या या गावातील या श्रद्धेय आदरणीय डॉक्टर बंधूंचा आदराने उल्लेख करतात तेव्हा माझी छाती अभिमानाने भरून येते. गावातील गोरगरीब, शेतकरी शेतमजूर असलेल्या ग्रामस्थांना अत्यंत अल्प दरात कधी पैसे न घेता येईल या बंधूनी दिलेली वैद्यकीय सेवा आमच्या नव्या पिढीने लक्षात ठेवली पाहिजे. आपल सार आयुष्य या नामांकित डॉक्टरांनी आपल्याच गावात घालवलं आणि अखेरचा श्वासही आपल्याचगावाच्या मातीत घेतला. धन्य ती माती आणि धन्य ती माणसे.
बरोबर १६० वर्षांपूर्वी आपल्या गावाच्या जवळपास ०३ किलोमीटर अंतरावरून खंडवा आणि दिल्लीकडे जाणारी रेल्वे लाईन ब्रिटिशांनी सुरू केली. स्टेशनला कुठले नाव द्यायचे यासंदर्भात चर्चा सुरू असताना आजूबाजूची जवळपास सर्वच खेडे गावे आकाराने आणि लोकसंख्येने सावदा शहरापेक्षा लहान असल्याने या स्टेशनला सावदा हे नाव दिले गेले असावे ….. खरंतर सावदा स्टेशन आणि सावदा यांच्यामध्ये आपले गाव येते …. परंतु सावदया पेक्षा आकार व लोकसंख्येने लहान असल्याने या रेल्वे स्टेशनला सावदा हे नाव दिले गेले. स्टेशन आणि सावदा शहर यामध्ये जवळपास ०५ किलोमीटरचे अंतर आहे. रेल्वे स्टेशनच्या आणि सावदा शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर आपले गाव आल्याने उद्योग व्यवसायात गावातील त्या काळातील मजुरांना सावदा स्टेशन व सावदा येथे मजुरी मिळू लागली. ज्यांना शेतीचे काम जमते ते मजूर शेतमजुरी करायचे आणि ज्यांना शेतमजुरीचे काम जमत नाही ते मजूर गावाजवळील सावदा रेल्वे स्थानकावरील मालगाडीतील साहित्य चढवणे आणि उतरवण्याचे हमाल म्हणून काम करायचे. दिवसभर काबाडकष्ट करून संध्याकाळी आपल्या परिवारात येऊन गुण्यागोविंदाने नांदणारे हे गाव पिढ्यान पिढ्या कष्टावर समाधान मानून जीवन जगत आहे.
१९३६ काँग्रेसचे ग्रामीण भागातले पहिले अधिवेशन फैजपूरला भरले होते. या अधिवेशनासाठी महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांचे सह अनेक मोठमोठे नेते रेल्वेने सावदा स्टेशनला उतरून मोटारीने सावदा शहराकडे जात असताना आपल्या गावावरून गेले होते. त्यावेळी तत्कालीन गावातील नेतृत्व करणाऱ्या थोरामोठ्यांनी आणि सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या गावच्या बस स्टॅन्ड जवळील रस्त्यावर थांबून महात्मा गांधी आणि नेहरूंना आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. याचे किस्से अनेक वर्ष या पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांना सांगितल्याचे मी स्वतः ऐकले आहे.
१९५२ च्या आसपास आपल्या भागात सर्वात मोठा दुष्काळ पडला होता. माणसांना खायला अन्न नाही. गुरांना खायला चारा पाणी नाही. सर्वत्र पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष दुर्भिक्ष. अशा अत्यंत कठीण काळात त्यावेळीच्या आपल्या गावकऱ्यांनी अत्यंत कठीण दिवस काढले होते. सरकारच्या माध्यमातून लाल ज्वारी लोकांना वाटली जात होती. सावदा रेल्वे स्टेशनवर या लाल ज्वारीने भरलेल्या व्यागन (मालगाडीचे डबे )चे डबे खाली करण्यासाठी मजुरी म्हणून आपल्या गावातील सर्व समाजातील माणसे त्या काळी जात होती. डब्यातील उरलेली लाल ज्वारी गोळा करून त्या काळातील गोरगरिबांनी आपले दिवस काढून त्या दुष्काळाची लढा दिला होता. गावातील प्रतिष्ठित असणारे त्याकाळचे स्वर्गीय डॉक्टर अनंतराव चौधरी, स्वर्गीय डॉक्टर गंगाधर चौधरी,स्वर्गीय झेंडू चौधरी ,स्वर्गीय जयराम महाजन ,स्वर्गीय चांगो पाटील आदींनी त्या काळात गावातील गोरगरिबांना अन्नधान्याची खूप मोठी साथ दिली होती. गावातील माणसे वाचली पाहिजेत… जगली पाहिजेत , गुराढोरांना चारा मिळाला पाहिजे यासाठी वरील साऱ्या आदरणीय महानुभावांनी गावाला संकटाच्या काळी मदत करून जगवले होते.
आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सर्व समाजाला न्याय देणारी घटना लिहून दिली. २६ जानेवारी १९५० पासून आपल्या देशात राज्यघटनेनुसार कारभार सुरू झाला. आपला देश हा खेड्यांचा आहे. जवळपास सहा लाख खेडी आपल्या भारतात आहेत. त्यामुळे खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. त्यानुसार खेड्यांचा विकास करण्यासाठी राज्यघटनेनुसार प्रत्येक गावात ग्रामपंचायत निर्माण झाली. आपल्याही गावात १९५३ च्या आसपास ग्रामपंचायत आली. आपल्या गावातील पहिले बिनविरोध सरपंच होण्याचा बहुमान स्वर्गीय झेंडू चौधरी यांच्याकडे जातो ( आदरणीय रमेश दोधू चौधरी आणि पुंडलिक भास्कर चौधरी यांचे आजोबा ) ज्यांना आपल्या गावातील पंचक्रोशीत ( परिसरात ) झेंडू सावकार या विशेष नावाने ओळखले जायचे. त्या काळात गावातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून स्वर्गीय झेंडूबाबा चौधरी यांचा उल्लेख केला जात होता. ज्याचे अनेक संदर्भ लोकांच्या बोलण्यातून आजही मिळतात. आपल्या गावांच्या जवळपास १५ – २० गावावर ज्यांची आर्थिक सत्ता होती ते स्वर्गीय झेंडूबाबा होते . ब्रिटिश कायद्यानुसार ज्यांच्याकडे सावकारी करण्याचा रीतसर परवाना होता. त्यामुळेच बंदूक वापरण्याचा अधिकार त्यांना ब्रिटिश कायद्याने मिळालेला होता. आपल्या गावाच्या जवळपासच्या १५ – २० गावात बंदूक वापरण्याचा परवाना कुणाकडेही नव्हता. आपल्याच गावात होता असे लोक आजही सांगतात.
तांदलवाडी पासून , लुमखेडा , उदळी , तासखेडा , गौरखेडा, रणगांव, रायपूर, सुदगाव ,दुसखेडा , मांगी , थोरगव्हाण , गाते , मस्कावद , कोचूर , दसनूर , सिंगनुर ,सावदा आदी गावातील शेतकऱ्यांची त्यांच्या आर्थिक व्यवहारांची त्या काळात व्याप्ती होती. असं पैशाने आणि मनाने श्रीमंत परंतु शिस्तीने अत्यंत कडक असलेलं, दानशूर व्यक्तिमत्व आपल्या गावाचे प्रथम सरपंच झाल्याने त्यांच्या काळात त्यांनी गाव विकासाचे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले. गावाला जी चावडी त्या जागेवर ग्रामपंचायत इमारत उभी करून गावाला त्यांनी दिशा दिली. आणि गावाला एकात्मतेच्या धाग्यात बांधून ठेवले. जातिपातीच्या त्या काळात भिंती असतानाही त्यांनी सर्व समाज घटकातील लोकांना मदतीचा हात दिला. आज ग्रामपंचायत तिला स्थापन होऊन ५३ वर्ष झालेली असली तरी प्रथम सरपंच झालेल्या आपल्या पैशाच्या श्रीमंतीने आणि विचारांच्या श्रीमंतीने गावाला दिशा दिलेल्या स्वर्गीय झेंडू बाबा यांना कसे विसरता येईल….?
गावातील शाळेत माझ्या गावातील गोरगरीब सर्व समाजातील मुले शिकली पाहिजेत यासाठी जीवाचं रान करणाऱ्या उच्चशिक्षित आदरणीय मुख्याध्यापिका स्वर्गीय तुळसाबाई महाजन यांचे योगदान मोठे आहे. त्या केवळ एक आदर्श शिक्षका नव्हत्या तर गावाला पुढे नेणाऱ्या आधुनिक काळातील एक समाजसेविका होत्या….. यांना कसं विसरता येईल…!
स्वर्गीय मुरलीधर चांगो पाटील, स्वर्गीय नामदेव जयराम कोलते , स्वर्गीय सोनू जयराम कोलते , स्वर्गीय सोपान तुकाराम पाटील , स्वर्गीय दोधू झेंडू चौधरी , स्वर्गीय शांताराम झेंडू चौधरी ,स्वर्गीय लक्ष्मण पाटील ,स्वर्गीय पुरुषोत्तम माधव पाटील , स्वर्गीय गणपत हरी शिंदे, स्वर्गीय अमृतरावजी शिंदे , स्वर्गीय दिगंबर पंडू चौधरी , स्वर्गीय आत्माराम विष्णू चौधरी , स्वर्गीय रामा नामदेव कोलते , पैगंबर वासी अमिरशहा फकीर ,तुराभ नादर पटेल , गुलाम कादर पटेल , मुराद अब्बास पटेल , बशीर यासीन पटेल , उखर्डु रमजान कुलकर्णी या साऱ्यांनी गावगाड्यातील माणसांना एकत्र ठेवून गावाच्या विकासासाठी ते नेहमी झटले. या सर्वांना कसं विसरता येईल…..?
” मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना ” या विचारांनी आपल्या गावातील हिंदू -मुस्लिम आणि साऱ्याच जातीपातीच्या माणसांनी आपापसातील बंधुभाव नेहमीच कायम ठेवून आपल्या पूर्वजांनी जो भाईचारा निर्माण केला आहे तो कायम आम्ही जपला आहे. पुढच्या तरुण पिढ्यांनी देखील हाच विचार जपून गावाला पुढे नेणे हेच महत्त्वाचे आहे.
१९९१ जनगणनेनुसार आपल्या गावात ४६० कुटुंब असून आपल्या गावाची लोकसंख्या १९३७ सांगितलेली आहे. आज थोडी वाढ झालेली असेल .
पूर्वी गावातील एकही घर बंद अवस्थेत नव्हते. आज पूर्वीच्या गावात बरीच घरे बंद अवस्थेत आहेत…..? नोकरीच्या आणि कामधंद्याच्या निमित्ताने जे बाहेर शहरास स्थिरावले त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी आपले निवास शहरांमध्येच ठेवल्याने त्यांच्या पूर्वजांची घरे आज बंद आणि पडक्या अवस्थेत आहेत. तर जे गावात राहिले त्यांच्या कुटुंबातील लोकसंख्या वाढल्याने त्यांची पिढ्यानपिढ्या असलेली घरे आज लहान पडू लागली आहे. कुटुंब वाढल्याने अनेकांना निवाऱ्याचा (घरांचा) प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी कोरडवाहू असलेल्या आपल्या शेतशिवारात अलीकडच्या काळात जमिनीत पाण्याची पातळी वाढल्याने आता बऱ्यापैकी बागायती दिसते आहे. त्यामुळे शेतमजुरीचे प्रमाण वाढलेले दिसते आहे . त्यासाठी दुसऱ्या गावावरून मजुरीच्या निमित्ताने मजुरी करणाऱ्यांचा एक वर्ग स्थिरावतो आहे. या सर्वांना पंतप्रधान आवास योजनेत आगामी कालखंडात घरे मिळवून देण्याचा माझा मानस आहे. आपल्या गावात राहतो त्याला गावाने घर दिले पाहिजे. हा विचार आमच्या गावातल्या पूर्वजांनी जपला आहे तो विचार आणि कृतीतून आणला पाहिजे…… पूर्वी गाव पैशाने फार श्रीमंत नव्हतं परंतु गावात विचारांची श्रीमंती होती…. संस्कारांची श्रीमंती होती…. गावाला गाव नातं असल्याने गावातील प्रत्येक मुलाला आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीची भीती वाटत होती. वडिलांपेक्षा गावातील माणसांची आदराने भीती वाटणे यासारखा आदर्श संस्कार दुसरा कुठला असूच शकत नाही. त्यामुळे जातीपातीच्या भिंती झूगारून गुण्या गोविंदाने आमची पिढी याच गावाच्या मातीत आणि शाळेत घडली. ” अब्दुल भी है मेरा भाई और सलमा भी है मेरी बहन ” हा विचार घेऊन आम्ही एकाच मराठी शाळेत शिक्षण घेतले….. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं … एकमेकांना समजून घेणे हे आपल्या गावाने आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकविले आहे…. तोच विचार आज पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला घेऊन जायचे आहे….
गाव म्हटलं की हजार भानगडी राजकारणा …. पण आपलं गाव त्यालाही अपवाद म्हणावे लागेल…. आमचे मतभेद क्षणिक असतात. त्या मतभेदांना गाव विकासाची आस असते …. गावाचा विकास झाला की मतभेद बाजूला पडतात… आणि पडले पाहिजेत …. कारण शेवटी आपल्या सगळ्यांचा आग्रह हा गावातील ग्रामस्थांचा आणि गावाचा विकास हाच असतो आणि तो जर होत असेल तर आपण मतभेद न ठेवता एकमताने गावाला जसे आपल्या पूर्वजांनी पुढे नेले तसेच आपण न्यायला हवे….
आज माझ्या गावात कधी नव्हे एवढी व्यसनाधीनता वाढलेली मला दिसते आहे…काही तरुण भावंडांकडे पाहिले की प्रचंड दुःख होते…. माझ्या गावातील ही तरुण भावंडे जर अशी व्यसनाच्या आहारी जाऊन संपली तर पुढच्या पिढीने काय आदर्श घ्यायचा…..? आज माझ्या गावाचे लोकनियुक्त सरपंच पद हे पुन्हा एकदा एका उच्चशिक्षित शिक्षिकेकडे आले आहे…. गाव विकासासाठी आपण सारे जण सारे मतभेद विसरून त्यांना साथ देऊ या…. पदे येतात आणि जातात. पण माणसाचे कर्म जर चांगले असेल तर माणूस कर्माने मोठा होतो पदाणे नाही….
माणसापेक्षा गाव मोठं असतं…. माणूस खूप लहान असतो. माणसाचा आयुष्य ६०- ७o वर्षांचं असतं फार झालं तर कुणी भाग्यवान वयाची १०० री गाठेल ….
पण गावाच आयुष्य शेकडो वर्षांचं असतं …. म्हणजेच माणसापेक्षा गावाच आयुष्य जास्त असते .गाव माणसापेक्षा मोठे असते……माणसाने मेल्यानंतरही जास्त दिवस जगायचे असेल तर गावासाठी , गावातल्या गोर गरीब सर्व समाजातील भावा-बहिणींसाठी आपण काम केलं पाहिजे…. आपली बुद्धी , आपल्या राजकारण , आपली समाजसेवा गाव विकासासाठी खर्च झाली पाहिजे. गावातून शिकून-सवरून लोक कायमचे लांब निघून जातात…. मोठमोठ्या शहरात उंच उंच हवेलीत आपला संसार थाटतात…. आणि ज्या गावाने घडविले ते गाव ती माणसे विसरून जातात…. ? जन्म आणि ओळख देणारे गाव कसे विसरता येईल बर…? कारण जे आपल्या जन्मासोबत येते आणि मेल्यानंतरही कायम राहते ते प्रत्येकाचं गाव असते…..म्हणून ते प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं …. आपण सारे मिळून आपल्या गावाला एक तीर्थक्षेत्र बनवू या …….गावासाठी जगू या गावासाठी मरू या…..!
संकलन
प्रा.डॉ.जतिन श्रीधर मेढे लहान वाघोदे