दांडेकर महाविद्यालयात महिला सन्मान कार्यक्रम उत्साहात संपन्न.


दांडेकर महाविद्यालयात महिला सन्मान कार्यक्रम उत्साहात संपन्न.
पालघर (प्रतिनिधी)
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे शिक्षक व शिक्षकेतर महिला सहकाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील महिला आपल्या कर्तव्यनिष्ठा, परिश्रम आणि समर्पणाने संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा महिला सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी भूषविले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, समाजामध्ये कोणतीही गोष्ट अति टोकाला गेली की त्याची प्रतिक्रिया उमटते. पूर्वी समाजात महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आणि त्या कनिष्ठ व प्रतिकूल अवस्थेत गेल्या, मात्र आजच्या काळात महिला शिक्षण, विज्ञान, प्रशासन, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. हीच त्या अन्यायाची सकारात्मक प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्पष्ट केले. स्त्री-पुरुष नात्यामध्ये समन्वय आणि सहकार्याची भावना असली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी ह्या वेळी केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर महिला सहकाऱ्यांनी सुंदर कविता, गीते आणि कथा यांचे सादरीकरण करून कार्यक्रमाला रंगत आणली. प्रा. अनघा देशमुख, डॉ. दर्शन चौधरी, प्रा. पूनम गणात्रा, सौ. नंदिनी ठाकूर, सौ. मोनिका कुलकर्णी, सौ, उज्वला जाधव यांनी कविता, ओवी, गीते सादर केले. डॉ संगीता ठाकूर यांनी महिला संस्कृती टिकविण्याचे, जोडण्याचे, आणि संवर्धनाचे कार्य करते अशी स्वरचित कविता सदर केली, प्रा. मधुर राऊत यांनी स्त्रिया देखील पराक्रमी आणि लढवय्या होत्या हे संशोधन सादर केले, प्रा. रेणू दुबे यांनी प्रकाश झोतात नसलेल्या महिलांचा सन्मान झाला पाहिजे अशा आशयाची कविता सादर केली. यावेळी उपस्थित सर्व महिलांना मोगऱ्याच्या फुलांच्या रोपांचे भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा डॉ. शीला गोडबोले पाईकराव यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या पदाधिकारी, श्रीमती अमिताताई राऊत, सौ. हिमाणीताई राऊत, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. तानाजी पोळ तसेच महिला विकास कक्षाच्या सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनात महिला विकास कक्षाच्या सर्व सदस्याचे आणि प्रा. आनंद जाधव यांचे विशेष योगदान लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी महिला विकास कक्षाच्या सदस्य प्रा. विवेक कुडू यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील मोठ्या संख्येने महिला सहकारी उपस्थित होत्या.
तसेच महाविद्यालयाच्या रा. हि सावे ग्रंथालयाद्वारेही जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी स्वलिखित व स्वतःला भावलेली कविता वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ प्रकाश हसनाळकर, समाजकल्याण अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण व स्त्री सक्षमीकरणासाठी केलेल्या महान कार्याची माहिती दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कांना कायदेशीर संरक्षण दिल्याचेही त्यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील डॉ दर्शना चौधरी म्हात्रे या परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध कविता सादर केल्या, या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन महाविद्यालयाचे ग्रंथालयीन कर्मचारी यांनी केले.