विराज प्रोफाइल’मध्ये नोकरीची सुवर्णसंधीदहावी ते पदवीधर तरुणांसाठी १२ आणि १३ मार्चला प्लेसमेंट ड्राइव्ह
‘विराज प्रोफाइल’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी दहावी ते पदवीधर तरुणांसाठी १२ आणि १३ मार्चला प्लेसमेंट ड्राइव्ह
पालघर,(प्रतिनिधी )दि. ११ मार्च : जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल आदी तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांना बोईसर येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यभरात आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या उपक्रमांतर्गत हा प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला आहे.
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून २०२५-२६ या आर्थिक वर्षात राज्यात एकूण १००० रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात २० रोजगार मेळावे आयोजित करण्याचा मानस जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने व्यक्त केला आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर, मॉडेल करिअर सेंटर पालघर आणि विराज प्रोफाइल लिमिटेड, बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मार्च व १३ मार्च २०२६ रोजी प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम विराज प्रोफाइल लिमिटेड वायर डिव्हिजन, जी-१/२, १/३ एमआयडीसी, बोईसर (४०१५०६) येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडणार आहे.
जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इतर तांत्रिक शाखेतील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रथम महा-स्वयम पोर्टलवर (www.mahaswayam.gov.in�) नोंदणी करून जॉब सीकर लॉगिनद्वारे डॅशबोर्डमध्ये जाऊन ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या पर्यायातून पालघर जिल्ह्यातील प्लेसमेंट ड्राइव्हची निवड करून संबंधित रिक्त पदांसाठी ऑनलाइन पसंती नोंदवावी.
तसेच उमेदवारांनी दोन प्रतीत बायोडाटा, फोटो, आधारकार्ड, सेवायोजना नोंदणी कार्ड तसेच शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची कागदपत्रे सोबत घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी महा-स्वयम पोर्टलला भेट द्यावी किंवा जिल्हा कार्यालयाच्या ०२५२५-२९९८१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
दरम्यान, जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांनी या रोजगार संधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.